English Version

संपूर्ण देशात शिक्षानगरी म्हणून प्रसिध्द कोटा शहर हे राजस्थानच्या दक्षिण पूर्वी भागात चम्बल नदीच्या काठी वसलेले आहे. पाणी आणि वीजेची कमतरता नसल्या मुळे येथे मोठ-मोठे उद्योग स्थापित झाले त्यामुळे हे शहर उद्योग नगरी म्हणून ही ओळखले जाते. उपलब्ध माहिती प्रमाणे समाजा तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा सन् १९३३ पासून झाली. कोटा शहरात मराठी भाषिकांनी सन् १९४५ साली महाराष्ट्रीय समाजाची स्थापना केली. प्रारंभी समाजाची गतिविधि फक्त गणेशोत्सव साजरा करण्या पर्यंतच मर्यादित होती कारण त्या काळी मराठी भाषिकांची संख्या फारच कमी होती. सन् १९५६ साली कोटा शहरात रेल्वे डिव्हिजन स्थापित झाले व बरेच महाराष्ट्रीय कुटुम्ब येथे स्थानान्तरित होऊन आले आणि त्या मुळे मराठी भाषिकांची संख्याही वाढली. समाजाचे कार्यही विस्तारित झाले. वेळोवेळी साजरे होणाऱ्या समारंभांसाठी समाजाला स्वत:चे असण्याची गरजही भासू लागली. सन् १९६७-६८ साली संस्थेचे नोन्दणीकरण “ महाराष्ट्रीय समाज, कोटा ”(रजिस्ट्रेशन क्र.२१) होऊन संस्थेला स्थायित्व प्राप्त झाले. सन् १९६८ साली सर्वांच्या सहकार्याने संस्थेने डडवाडा क्षेत्रात ७० गुणा ६० चौरस फुटाचा भूखंड (प्लॉट) विकत घेतला. त्या नंतर सर्वांच्या सहयोगाने दोन खोल्या आणि अस्थायी रंगमंच तयार झाले. कालांतरात भवनाच्या भूखंडा भोवती भिंती उभारण्यात आल्या व तसेच अस्थायी फर्श ही तयार झाले. संपूर्ण जागा वरून उघडी असल्या मुळे बऱ्याच समारंभात पाऊस पाण्याचा त्रासही सोसावा लागला. नंतरच्या दहा ते बारा वर्षाचा काळ युवा वर्गाच्या अभावी समाजाच्या वास्तु निर्माणाच्या द्ृष्टिने मंदावला पण त्या काळच्या समर्पित कार्यकर्त्यांनी समाजात साजरे होण्याऱ्या कार्यक्रमांमध्ये कधीच खंड पडू दिला नाही. १९९५ साली युवा कार्यकारिणीच्या उत्साहाने व सर्वांच्या सहकार्याने समाज भवन आर.सी.सी. ने आच्छादित करण्यात आले व वास्तुला नवीन स्वरूप प्राप्त झाले. आवश्यकतेनुसार जुने भाग मोडून नवीनीकरण करण्यात आले. वर्तमान परिस्थितीत समाज भवनांत एक मोठे सभागृह, सुसज्जित “ छत्रपति शिवाजी रंगमंच ”, सोबत दोन ग्रीनरुम्स, व्यवस्थित कार्यालय, स्वयंपाकघर, ९ खोल्या आणि मध्यम आकाराचा एक हॉल आहे. तसेच भवन परिसरात श्री गणेश मंदिर आहे. मंदिरात रोज सकाळ-संध्याकाळ परंपरे प्रमाणे विधिवत पूजा होत असून दोन्ही चतुर्थींना अभिषेक होतो. श्री गणेश मंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी वेगळी समिति नेमण्यात आली आहे. सन् २००६ साली वास्तुतील सभागृहाचे जुने दगडी फर्श काढून नवीन फर्श कोटा स्टोनचे बसविण्यात आले आहे व त्या मुळे सभागृहाला विशेष स्वरूप प्राप्त झाले आहे.

संस्था महाराष्ट्रीय भाषा व संस्कृतीला जोपासण्याच्या कार्या सह स्थानीय लोकांशी व तसेच राजस्थानच्या संस्कृतीला अनुसरून कार्य करीत आहे. समाजा तर्फे दर वर्षी मकर संक्रांति, गुढी पाडवा, शिवाजी जयंति, महाराष्ट्र दिन, राजस्थान दिवस, गणेसोत्सव, दसरा,कोजागरि पौर्णिमा, दीपावली मिलन समारंभ इत्यादि कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच नव संवत्सर आणि दिवाळी प्रसंगी सर्व संस्थांना व सभासदांना शुभेच्छा कार्ड पाठविण्यात येतात. दर वर्षी संस्थे कडून नवीन वर्षाची दिन दर्शिका भेट स्वरूप देण्यात येते. बाळ गोपाळ व युवा वर्गात समाजा प्रति आकर्षण असावे यास्तव वेळोवेळी त्यांच्या उत्साह वर्धनासाठी निरनिराळ्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. समाजात एक लहानसे वाचनालय असून नियतकालिकेही उपलब्ध असतात. संस्थेचे विस्तारित कार्य असल्या मुळे सहयोगासाठी वनिता समाज, हौशी मित्र मंडळ, श्री विद्या मंदिर, मयुरेश सोसायटी आणि श्री गणेश मंदिर समितिचे सहकार्य सतत मिळत असतं. कुठल्याही राष्ट्रीय विपदे प्रसंगी मदती साठी संस्था नेहमीच तत्पर असते. गुजरात आणि लातूर धरणीकंपात प्रभावित झालेल्यांना व तसेच कारगिल युध्दच्या वेळी संस्थे तर्फे यथाशक्ति आर्थिक मदत पाठविण्यात आली. संस्था मध्यवर्ती संघटना बृहन्महाराष्ट्र मंडळाची दीर्घकालिक सदस्य आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळा तर्फे राबविण्यात येणाऱ्या निरनिराळ्या योजनां मध्ये महाराष्ट्र समाजाचा सहभाग असतो. महाराष्ट्रीय समाजाच्या वास्तुचा उपयोग सभासदांच्या व्यतिरिक्त डडवाडा क्षेत्रातील लोकांनाही होत आहे. समारंभासाठी समाजाचे सभागृह माफक दरात उपलब्ध आहे. तसेच प्रवासियांच्या अल्प आवासासाठी खोल्याही उपलब्ध आहेत. संस्थेला देशातील बऱ्याच महान व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्याची सुवर्ण संधिही लाभलेली आहे. यात प्रामुख्याने वसंत दादा पाटील, मोहन लाल सुखाडिया, यशवंत राव चव्हाण, प्रताप सिंह राणे, माधव राव सिंधिया व पंडित कृष्ण मोहन भट्ट इत्यादि आहेत.

महाराष्ट्रीय समाज आपल्या सहयोगी संस्थेना बरोबर घेऊन आपले सामाजिक दायित्व पूर्ण करीत आहे व समाज भवनांत पुढेही होणाऱ्या निर्माण कार्यासाठी संकल्पबध्द आहे. समाज फक्त चार भिंतीचा वास्तू नसून सर्व कुटुम्बाच्या एकत्र होण्याचे संधिस्थल आहे. समाजा तर्फे वेळोवेळी आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांत सर्वांने जातीने उपस्थित रहावे म्हणजे सर्वांच्या अनवरत भेटी होत राहतील व सामाजिक सामंजस्य वृध्दिंगत होईल. सुव्यवस्थित आणि संगठित समाज देशाच्या स्थायित्वाचा प्रमुख आधार असतो. श्री गणरायाच्या कृपेने व पूर्वपिढीच्या आशीर्वादाने आज आपल्या मंडळाचे स्वत:चे वास्तू आहे. पूर्वपिढीतील सक्रिय कार्यकर्त्यांच्या आदर्शाला अनुसरून आपण स्थानीय संस्कृतिशी समरस होऊन आपल्या मायबोलीचे व संस्कृतिचे संरक्षण व संवर्धन करण्यास समर्थ होऊ हा दृढ विश्वास आहे. आमच्या ह्या विश्वासाला आपण सर्वांच्या सहकार्याचा आधार सतत लाभत राहील ही अपेक्षा।

लेबल: ,

 
प्रेषक : साईट प्रबंधन रविवार, 6 मई 2007 10:22 am.